किहीम समुद्रकिनाऱ्यावरील शिवलिंग- एक रहस्य

        सर्वप्रथम सर्वांना श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. अलिबाग पासून १३ किमी अंतरावर असलेल्या किहीम समुद्रकिनाऱ्यावरील हे दृश्य.किहीम सुमुद्रकिनारा तिथली सफेद वाळू,अथांग पसरलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा,चविष्ट मच्छीचे जेवण यासाठी प्रसिद्ध आहेच, पण याच समुद्रकिनारी अजून एक रहस्य दडले आहे.किहीम समुद्रकिनारी पोहचल्यावर दक्षिणेकडील बाजूस वीजनिर्मिती करण्याहेतूने एक कठडासदृश्य बांधकाम दिसून येते. या इमारतीच्या डावीकडील बाजूस थोड्याच अंतरावर एक शिवलिंग दर श्रावण महिन्यात आपल्याला दिसून येते.श्रावण महिना सोडला तर बाकी वर्षभर हि पिंड वाळूखाली दडून बसलेली असते त्यामुळे आपल्याला ती दिसून येत नाही.पावसाळ्यात समुद्राचे पाणी खवळलेले असते आणि त्यामुळे श्रावण महिन्यापर्यंत या शिवलिंगावरची वाळू निघून पिंडीचे दर्शन व्हायला सुरुवात होते.
जुलै महिनाअखेर ते सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस या शिवलिंगाचे दर्शन आपल्याला घेता येऊ शकते.ओहोटीच्या वेळी पाणी आत गेल्यावर पिंडीपर्यंत चालत जाता येते.मोठ्या संख्येने स्थानिक आणि पर्यटक या शिवलिंगाचे दर्शन करण्यासाठी ठिकठिकाणांहून येत असतात.
अतिशय सुस्थितीत असलेले सदर शिवलिंग या ठिकाणे कसे आले? कुठून आले? हे मात्र अजूनही रहस्य आहे.तर आपण एकदा तरी या शिवलिंगाचे दर्शन घ्यायला जरूर या. छायाचित्रामध्ये मागील बाजूस उंदेरी आणि खांदेरी जलदुर्गदेखील दिसून येत आहेत.
ओम नमः शिवाय….